आकार यशोत्सव पुणे 2017- 2018

आकार यशोत्सव : कर्तृत्ववान महाराष्ट्र वीरांचा गौरव सोहळा पुणे येथे संपन्न !

मा.डॉ. राजेंद्र भारूड IAS (मुख्य कार्यकारी अधिकारी,सोलापूर) यांच्या शुभहस्ते UPSC व MPSC यशवंतांचा व माता-पित्याचा प्रेरणादायी सत्कार समारंभ गणेश कला व क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे येथे संपन्न झाला.

“स्पर्धा परीक्षेच्या यशात सकारात्मकता महत्वाची !”
डॉ.राजेंद्र भारूड यांचे मत; आकार फाउंडेशन पुणे तर्फे रंगला यशस्वीतांचा गौरव सोहळा !

“गरीब परिस्थिती यशात अडथळा ठरत नाही, तर दरिद्री मानसिकता आपल्या अपयशामागे असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोन अंगी बनवला पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेच्या यशात सकारात्मकता आणि कठोर परिश्रम महत्वाचे असतात” असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आदिवासी समाजातील पहिले भारतीय प्रशासकीय सेवा प्राप्त अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड IAS यांनी केले.

आकार फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षांत (केंद्र व राज्य लोकसेवा अयोग) यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ‘यशदा’चे माजी संचालक रवींद्र चव्हाण, डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वाढई, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश लाड, आकार फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रा. राम वाघ, पुणे आकार फाउंडेशनचे व्यवस्थापक प्रा.प्रवीण मुंढे, संयोजक प्रा.सारिका मुंढे, प्रा.ज्ञानेश्वर जाधवर, प्रा.सागर कांबळे आदी उपस्थित होते.

समारंभाचे प्रमुख अतिथी मा.डॉ राजेंद्र भारूड यांचे हस्ते “आकार स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती अभियान 2019″चे उद्घाटन करण्यात आले. या अभियानाद्वारे दरवर्षी प्रवेश परीक्षेद्वारे निवड झालेल्या 300 गरीब व होतकरू विद्यार्थ्याना एक वर्षाचे UPSC व MPSC चे मोफत व सवलतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. पुढील 2019 वर्षांसाठी पुणे व औरंगाबाद विभागातून 300 ऐवजी प्रत्येक विभागातून 1000 याप्रमाणे पुणे व औरंगाबाद विभागातून एकूण 2000 विद्यार्थ्यांची UPSC व MPSC मार्गदर्शनासाठी निवड केली जाईल अशी माहिती याप्रसंगी प्रा.राम वाघ यांनी दिली.

डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले, “यशाप्रमाणे अपयश पचवण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे. स्पर्धा परीक्षेत पद मिळवल्यानंतर हुरळून जाता कामा नये. पद मिळाल्यानंतर आपली जबाबदारी अधिक वाढते. कारण डाग न लागता समाजाची सेवा करण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपण असतो. शुद्ध हेतूने काम केल्यास ते आपोआप यशस्वीरीत्या पूर्ण होते. इच्छाशक्ती, बौद्धिक क्षमता, कठोर परिश्रम, अपयश पचवण्याची शक्ती आपल्या यशात गरजेच्या असतात.”

“वडील जन्माआधीच गेल्याने बालपण कठीण अवस्थेत गेले. पण सतत परिस्थिती बदलण्याचा विचार मनात होता. आई-मावशी आणि शिक्षक यांनी घडवले. निष्ठा, शिस्त, नम्रता आणि कामाची तळमळ आपल्याकडे असावी. आई-वडील आणि शिक्षक यांचा आशीर्वाद हाच आपल्यासाठी मोठा असतो. आपल्या कामातून आनंद मिळावा आणि पालकांना अभिमान वाटावा असे कार्य आपल्या हातून घडावे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे,” असे डॉ.राजेंद्र भारूड म्हणाले.

डॉ. विजय वाढई, मा.प्रितेश लाड, मा.रवींद्र चव्हाण यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. राम वाघ यांनी स्वागत-प्रास्ताविकाद्वारे आकार फाउंडेशन हे गरीब व वंचित विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे आले आहे व त्याचं दिशेने गुणवत्ता व प्रामाणिकतेने सर्वोत्तम मार्गदर्शनाचे काम अविरत सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला. ज्ञानेश्वर जाधवर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.प्रवीण मुंढे यांनी आभार मानले.

देशाच्या किंवा राज्याच्या प्रशासनात आपले कर्तव्य व स्वीकारलेली जबाबदारी निष्टेने पूर्ण करण्याची तयारी असेल तर या ! असे आवाहन डॉ.राजेंद्र भारूड उपस्थित विद्यार्थ्यांना करून आत्मविश्वास वाढवणारे मार्गदर्शन केले. उपस्थित 43 यशवंतांपैकी काही यशवंतांची प्रेरणादायी मनोगते अशा या आकार यशोत्सवाला सुमारे 1700 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली आणि विशेष महत्वाचे म्हणजे सकाळी 9 ते दुपारी 2:30 पर्यंत चाललेला हा समारंभ अद्वितीय प्रेरणा व यशस्वी करिअर ची नवी उमेद जागविणारा ठरला.

आकार यशोत्सवाचे निमंत्रण स्वीकारून सोलापूर ते पुणे प्रवास करून आलेले प्रिय मित्र आदरणीय डॉ राजेंद्र भारूड IAS यांचे व इतर उपस्थित सर्व मान्यवरांचे मन:पूर्वक आभार, मोठ्या संख्येने उपस्थित पुणे विभागातील विद्यार्थी मित्रांचे आकार फाउंडेशन मध्ये स्वागत. सर्व यशवंतांना पुढील जनसेवेसाठी प्रशासन व लोककल्याणकारी प्रशासकीय करिअर च्या हार्दिक शुभेच्छा.